उन्हाळ्यात घ्या शेळ्यांची काळजी …

उन्हाळ्यात घ्या शेळ्यांची काळजी …

शेतकरी मित्रांनो, शेतीला उत्तम असा जोडधंदा म्हणून शेळीपालन केले जाते. आपल्या भागात शेतकरी बंदिस्त तसेच अर्धबंदिस्त शेळीपालन करतात. उन्हाळ्यात जर आपण शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम सुरु होतात. अशा वेळी आपण अगदी कमी खर्चात आपल्या दैनंदिन व्यवस्थापनात काही सोपे बदल करून होणारे नुकसान टाळू शकतो.

उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम

खाद्य कमी प्रमाणात खाणे- वाढलेल्या उष्णतेमुळे व दमटपणामुळे शेळ्यामध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व त्याचा परिणाम वाढीवर होतो.

माजावर परिणाम- उष्ण वातावरणात मादी शेळ्यामध्ये माजावर येण्याचे प्रमाण कमी होते.

दुधाचे प्रमाण कमी होणे- करडाना दुधाची आवश्यकता असते अश्या वेळी जर शेळ्यांचे दुध कमी झाले तर करडाची वाढ नीट होत नाही.

शेळ्या आजारी पडणे- उन्हाळ्यात उष्णतेमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते त्यामुळे शेळ्या विविध रोगांना बळी पडतात.

उष्माघात- तीव्र उन्हामुळे व दमट वातावरणामुळे शेळ्यांना उष्माघात होऊन त्या तात्काळ मरण पावतात.

कोणती काळजी घ्याल?

  • शेळ्यांमध्ये खाद्य कमी प्रमाणात खाणे ही समस्या येऊ नये यासाठी खाद्य देत असताना सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा द्यावे. म्हणजेच उन्हाची तीव्रता ज्यावेळी असते त्या वेळी खाद्य देणे टाळावे. तसेच जर शेळ्या चरायला जात असतील तर सकाळी लवकर सोडाव्यात व दुपारचे उन कमी झाल्यासच परत आणाव्यात. उन्हाच्या वेळी हिरवा चारा द्यावा.
  • शेळ्यांच्या माजावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी संतुलित आहार द्यावा ज्यामध्ये क्षारमिश्रणाचे प्रमाण व्यवस्थित असावे. क्षारमिश्रण आपल्या नजीकच्या दवाखान्यात उपलब्ध आहे का ते पाहावे नसल्यास बाहेरून विकत घेऊन दिले तरी चालेल.
  • जंतनाशके – मोठ्या शेळ्या तसेच लहान करडाना योग्य त्या प्रमाणात जंतनाशके द्यावीत.(वाचा- जंतनियंत्रणाचे सोपे वेळापत्रक)
  • स्वच्छ पाणी- शेळ्यांना उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध असावे. लोखंडी प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात गरम होते त्यामुळे माती किंवा सिमेंट पासून बनलेल्या भांड्यातून पाणी द्यावे. ठराविक अंतराने पाणी पाजण्यापेक्षा त्यांना २४ तास पाणी शेड च्या परीसरात उपलब्ध करून दिलेले चांगले.
  • निवारा- उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण होण्यासाठी पुरेसा निवारा उपलब्ध करून द्यावा. निवारा म्हणजेच झाडाची सावली, शेड, बांबूचे किंवा झावळ्याचा आडोसा अशा प्रकारच्या स्थानिक गोष्टी वापराव्यात. गरज पडल्यास शेडमध्ये आपण पंख्याची व्यवस्था करू शकतो ज्यामुळे आतील हवेचे सर्कूलेशन व्यवस्थित होऊन तापमान नियंत्रणात राहील. जर या गोष्टी उपलब्ध नसतील तर योग्य क्षमतेचे शेड नेट चे कापड आणून आपण सावली तयार करून शकतो व उष्माघातापासून संरक्षण करू शकतो.
  • हायड्रोपोनिक्स व अझोला- या आधुनिक चाऱ्यांचा वापर करून हिरवा चारा तसेच प्रथिने यांची कमतरता भरून काढता येऊ शकते. यापैकी अझोला लागवड ही अतिशय सोपी असून अगदी कमी खर्चातदेखील करता येऊ शकते. (वाचा- अझोला लागवड पद्धत)

अशारितीने जर आपण आपल्या व्यवस्थापनात थोडासा बदल केला तरीही उन्हाळ्यात आपल्या शेळ्यांची काळजी घेऊ शकतो.


Write a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!