हिवाळ्यात वासरांची घ्यावयाची काळजी

हिवाळ्यात वासरांची घ्यावयाची काळजी

शेतकरी मित्रहो, मोठ्या जनावराच्या तुलनेने लहान वासरे वातावरणातील बदलास जास्त संवेदनशील असल्याने ते लगेच आजारी पडतात. थंडीच्या दिवसात हवेत गारवा असल्याने श्वासाचे आजार आणि  खासकरून न्यूमोनिया ची लागण होऊन वासरे दगावतात. वेळीच उपचार केला तर आजार आटोक्यात येऊ शकतो मात्र उपचार करणे खर्चिक असल्याने आपले आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जर आपण वेळीच योग्य ती उपाययोजना केली तर थंडीच्या दिवसातील आजारास आळा बसू शकतो.

काळजी कशी घ्याल ?

  1. वासरे बांधण्याची जागा कोरडी राहील असे पाहावे. जर वासरे गोठयामध्ये बांधण्यात येत असतील तर शेडची जमीन कोरडी ठेवावी. वारसे जर बाहेर बांधण्यात असतील तर त्यांनी मूत्र किंवा शेण टाकल्यास ते लगेच साफ करावे किंवा वासरे दुसऱ्या जागी बांधावीत.
  2. सफाई करत असताना जंतुनाशकाचा (डिसइन्फेक्टन्ट ) वापर हमकास करावा जेणेकरून परिसरातील रोगजंतू नष्ट होतील.
  3. वासरे रात्रीच्या वेळी उघड्यावर न बांधता गोठ्यात किंवा बंदिस्त जागी बांधावीत. रात्रीच्या वेळी खासकरून पहाटे थंडीची तीव्रता जास्त असते त्यामुळे गोणपाट किंवा रिकामी पोती वापरून खिडक्या झाकाव्यात.
  4. रात्रीच्या वेळी वासरे बांधण्याच्या ठिकाणी विजेचे मोठे बल्ब लावावेत जेणेकरून थोडीफार उब राहील. तसेच वासरांच्या खाली कोरडे गवत किंवा गोणपाट टाकावेत. पाश्चात्य देशात वासरासाठी रेडीमेड जाकेट उपलब्ध असतात पण आपण आपले जुने शर्ट इ त्यासाठी वापरू शकतो.
  5. कळपातील इतर आजारी जनावरासोबत वासरे बांधू नयेत.
  6. वासरांच्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्यांना पुरेसा खुराक देणे अतिशय आवश्यक आहे.
  7. वासरांना पिण्यासाठी एकदम थंड पाणी न देता जरासे कोमट व स्वच्छ पाणी द्यावे.
  8. दिवसाच्या वेळी कोवळ्या उन्हात वारसांना सोडावे/बांधावे जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातुन उब तर मिळेलच मात्र विटामिन डी सुद्धा मिळेल व वासरांची वाढ व्यवस्थित होईल.

अशा रीतीने जर आपण वरील गोष्टीकडे लक्ष दिले तर निश्चितच थंडीत वासरे जिवंत राहतील व भविष्यात आपल्याला भरघोस उत्पन्न देऊन आपल्या गोठ्याची शान वाढवतील.

लेख आवडला असल्यास आपल्या मित्रांना नक्की share करा.

(लेखिका- डॉ निकिता सोनवणे, पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!