जनावरांचे मायांग बाहेर येणे- कारणे, प्रथमोपचार व प्रतिबंध

जनावरांचे मायांग बाहेर येणे- कारणे, प्रथमोपचार व प्रतिबंध
          शेतकरी बंधुनो, आपल्याकडील दुधाळ जनावरांमध्ये गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर मायांग बाहेर येणे ही समस्या आपल्या सर्वांना निश्चितच माहित असणार. मायांग म्हणजे जनावराच्या योनीमार्गातील अवयव होय, यामध्ये योनीमार्गाच्या भिंती, गर्भाशयाचे मुख किंवा पूर्ण गर्भाशय यांचा समावेश होतो. ज्या वेळी हे अवयव त्यांची नैसर्गिक जागा सोडून शरीराच्या बाहेर येतात त्या वेळी आपण सामान्य भाषेत जनावराचे मायांग बाहेर आले असे म्हणतो. 

प्रादुर्भाव– ही समस्या प्रामुख्याने गाई व मेंढी या प्राणीवर्गात दिसून येते परंतु म्हैसवर्गातही याचा प्रादुर्भाव आढळतो. 

प्रकार-

१.      गाभण अवस्थेत मायांग बाहेर येणे –  यात योनी व गर्भाशयमुख योनीमार्गातून बाहेर येते

२.      व्यायल्या नंतरचे मायांग बाहेर येणे- यात पूर्ण गर्भाशय बाहेर येते. 

कारणे-

१.      रक्तामधील इस्ट्रोजन व रिल्याक्झीन या संप्रेरकाचे (hormone) प्रमाण वाढणे.

२.      शरीरातील चरबीचे जास्त प्रमाण

३.      अनुवंशिकता

४.      बंदिस्त गोठापद्धत व त्यामुळे व्यायामाचा अभाव

५.      बुरशीजन्य चाऱ्याचे सेवन

६.      योनिमार्गातील जळजळ (रोगजंतूची लागण) व त्यामुळे होणारे योनीमार्गाचे आकुंचन

७.      अंडकोशाचे आजार (Cystic) 

लक्षणे-

१.      चारा न खाणे

२.      अस्वस्थता

३.      गर्भाशयाचे तीव्र आकुंचन

४.      ऊठ बस करणे

५.      मायांग योनिमुखातून बाहेर येणे/लोंबणे  

अशाप्रकारची लक्षणे दिसू लागताच तत्काळ पशुवैद्यकास संपर्क करावा व यादरम्यान आपण खालीलप्रमाणे प्रथमोपचार करू शकता.

प्रथमोपचार-

१.      मायांग बाहेर आले असल्यास त्या जनावरास इतर जनावरापासून दूर ठेवावे.

२.      अशा जनावरच्या पुढील बाजूस लहान खड्डा/उतार बनवावा व त्याचे पुढचे पाय त्यात राहतील असे पाहावे.

३.      मायांग हे अतिशय नाजूक असते थोडीशी जरी इजा झाली तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो त्यामुळे कुत्रा, मांजर, कावळे इ पासून त्याला इजा होणार नाही याकडे चांगल्या प्रकारे लक्ष घ्यावी.

४.      गोठ्यातील शेण/मुत्र जर मायांगास लागले असेल तर पोट्याशियम परम्यांगनेट च्या पाण्याने धुवून निर्जंतुकीकरण करावे.

५.      मायांगाला सूज येऊ नये म्हणून  बाजारात काही स्प्रे उपलब्ध आहेत पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्याचा वापर करता येऊ शकतो.

६.      स्वच्छ कपडा साखरेच्या पाण्यात बुडवून बाहेर आलेल्या मायांगावर ठेवल्यास सूज कमी होण्यास मदत होते.

७.      बाहेर आलेल्या मायांगास अधून मधून बर्फाने शेकावे जेणेकरून सूज कमी येईल.

प्रतिबंध-

१.     जनावरास समतोल आहार द्यावा.

२.     जनावराच्या खाद्यात ऊसाच्या वाड्याचा अति प्रमाणात वापर हे मायांग बाहेर येण्याचे एक प्रमुख कारण आहे. (लेख- ऊसाच्या वाड्यामुळे जनावरात होणारी ऑक्झालेटची विषबाधा व त्यावरील उपाययोजना)

३.     ज्या जनावराचे मागील गाभण किंवा व्यालेल्या काळात मायांग बाहेर आलेले असेल अशा जनावरास समोरची बाजू उंच असलेल्या ठिकाणी बांधणे टाळावे.(समोरची बाजू उंच असल्यास पोटातील अवयावामुळे गर्भाशयावर जास्त दाब येतो व मायांग बाहेर येण्याची शक्यता जास्त असते).

४.     गाभण जनावरास नियमित पुरेसा व्यायाम द्यावा, एकाच जागी बांधणे टाळावे.

(लेखिका- डॉ सुचित्रा सुरेश माळी, पशुप्रजनन व प्रसूतीशास्त्र, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ)

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!