​मानवी आहारातील अंड्यांचे महत्व

​मानवी आहारातील अंड्यांचे महत्व
              दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार “जागतिक अंडी दिन” म्हणून साजरा केला जातो; म्हणजेच यावर्षी 12 ऑक्टोबर ला दिवस साजरा करण्यात येईल.मानवी आहारमूल्यांमध्ये प्रथिनांची आवश्यकता व कुपोषण निर्मुलानासाठी अंडीसेवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आपण आहारात फळभाज्या,पालेभाज्या आणि डाळींचा वापर करतो; पण प्रथिनांचा उत्तम व सहज उपलब्ध होणारा स्रोत म्हणजे “अंडी”.

पोषणमूल्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर…

* १००ग्रॅम वजनाच्या केळीमधून आपणास १.३ ग्रॅम प्रथिने मिळतात.

* १०० ग्रॅम उकडलेल्या अंड्यामधून आपल्याला १३ ग्रॅम प्रथिने मिळतात.

अंड्यामधील पोषण तत्वे :-

प्रथिने,मेद, जीवनसत्व अ, ड, ई, रायबोफ्लॅविन, पायरिडॉक्सिन, कोलिन,लेसिथिन,सायनोकोबालामाईन,कॅल्शियम, फॉसफरस,झिंक,आयर्न,कॉपर,आयोडीन, सेलेनियम,फोलेट इत्यादी.

प्रथिनांचा उत्तम स्रोत असणारी अंडी माणसाच्या विविध वयोगटात उपयुक्त ठरतात

1. लहान मुले:-

१) कॅल्शियम व फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने अंडी लहान मुलांच्या हाडांना व स्नायूंना बळकटी देतात.

२) अंड्यामधील पिवळा बलक हा मेदयुक्त असल्याने मुलांचे वजन वाढते.

३) जीवनसत्व​​ अ आणि ल्युटीइन, झियाझ्यान्टिंनसारख्या अँटीऑक्सिडंट्समूळे मुलांची दृष्टी सतेज राहते.

४) झिंक मुळे मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढते.

2.गर्भवती माता व स्तनदा भगिनी:-

१) कोलिन नामक पोषण घटकामुळे गर्भातील बालकाच्या मेंदूची वाढ योग्य होते.

२) आयोडीनच्या उपलब्धतेमूळे गर्भातील बालकाची मानसिक वाढ व्यवस्थित होते.

३) आयर्नमूळे गर्भवती महिलांना लोहाची कमतरता भासत नाही.

४) मेंदूवरील आवरणास उपयुक्त असणारे ‘ड’ जीवनसत्व अंडी सेवनाने आईच्या दुधातून अर्भकास मिळू शकते.

५) गर्भवती माता व स्तनदा भगिनींना अतिरिक्त २०० ते ३०० कॅलरिजची आवश्यकता असते.एका अंड्यापासून ७० कॅलरीज उपलब्ध होतात.

3.वयोवृद्ध व्यक्ती:-

१) जीवनसत्व ड, कॅल्शियम,फॉसफरस सारख्या घटकांमुळे वयोवृद्ध व्यक्तीमधील हाडांचा ठिसूळपणा,सांधेदुखी असे विकार अंडीसेवनाने कमी होतात.

२) अंड्यातील पांढऱ्या भागाच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका टाळता येतो.

३) ओमेगा-3 फॅट्समूळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

४) वाढत्या वयामुळे उद्भवणारा मोतिबिंदूचा विकार अंडीसेवानाने कमी होतो.

५) ‘आयर्न’ (लोह) मूळे वृद्धांना शारीरिक हालचालीसाठी आवश्यक ऊर्जा मिळते.

अंड्याबाबतचे गैरसमज:-

१) अंडी मांसाहारी आहेत :- संशोधनाअंती अंडी ही शाकाहारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

२) अंडी उष्णतावर्धक आहेत:- अंडी ही उष्ण असून उन्हाळ्यात त्यांचे सेवन करू नये असा समज आहे जो सरासर चुकीचा आहे.

                   तर मग अंड्याबाबतचे असे गैरसमज मनातून काढून टाकून आपल्या शरीराची प्रथिनांची गरज अंडी सेवनाने भागवून “जागतिक अंडी दिन” उत्साहाने साजरा करूया.

(लेखक-  डॉ. प्रविण सौदागर पतंगे, पशुधन विकास अधिकारी (गट अ ), ता.एटापल्ली जि. गडचिरोली)

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!