अझोला- प्रोटीनचा खजाना आपल्या दारात

अझोला- प्रोटीनचा खजाना आपल्या दारात
                    दुग्धव्यवसाय करत असताना आपण जनावराच्या खाद्यावरील खर्च कमी ठेवला तर मिळणारा नफा हा निश्चितच जास्त असणार. हा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला चारा हा शेतात किंवा घरच्या घरी तयार करावा लागेल त्यासाठी शास्त्रीय पद्धती माहिती असणे आवश्यक आहे. खाद्यातील प्रोटीन ची कमतरता भरून काढणारया अझोला नावाची वनस्पतीची लागवड करणे हा यापैकी एक चांगला पर्याय आहे.

अझोला काय आहे? – ही पाण्यावर तरंगणारी एक शेवाळवर्गीय वनस्पती आहे. नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता असल्यामुळे ह्या  वनस्पतीमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. यामध्ये २५ते ३०% प्रोटीन(प्रथिने), 1० ते १५%खनिजे, ७ ते १०% अमिनो आम्ले, जैवक्रीयाशील पदार्थ इ. घटक असतात. मुख्य म्हणजे लीग्निन नावाचा पदार्थ यात कमी असल्यामुळे हे पचायला हलके असते.

अझोला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य- सिलपोलीन पेपर (१२० गेज किंवा जास्त जाडीचा), सुपरफोस्फेट, खनिज मिश्रण, विटा, काळी माती, शेण, अझोला कल्चर, शेडनेट/तुराटया/झावळ्या इ.

 अझोला तयार करण्याची पद्धत- खालीलप्रमाणे आपण अझोलाचे उत्पादन घेऊ शकतो.

 1. वाफा तयार करणे– १० x ५ फुट आकाराचा व ९ ते १० इंच खोली असलेला वाफा तयार करावा. वाफा तयार करत असताना खड्डा करण्याऐवजी विटा वापरून जमिनीच्यावर केलेला चांगला. वाफा तयार करत असताना तो शक्यतो झाडाच्या किंवा शेडनेट (50%) च्या सावलीत तयार करावा. जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे अझोलाच्या वाढीवर अडचण येणार नाही. वाफ्याचा पृष्ठभागावरील दगड गोटे साफ करून घ्यावेत. वाफ्याच्या बाहेरून थोडासा चर काढावा जेणेकरून पावसाचे पाणी आत जाणार नाही.
 2. सिलपोलीन पेपर अंथरणे-वाफ्यावर सिलपोलीन पेपर अंथरून घ्यावा. त्याआधी त्याच्याखाली रिकामी सिमेंट किंवा खताच्या पोत्यापासून गादी तयार करावी जेणेकरून पेपर दीर्घकाळ टिकेल. वाफ्याच्या कडावर पेपर काटकोनात येईल असे पाहावे. वाफ्याच्या बाहेर आलेला पेपर विटा किंवा माती टाकून फिक्स करावा.
 3. वाफा भरणे– सिलपोलीन पेपर अंथरलेल्या वाफ्यामध्ये अंदाजे १० ते १५ किलो (खडे नसलेली) सुपीक माती टाकावी. १० लिटर पाण्यात ३ किलो ताजे शेण+४० ग्राम सुपर फोस्फेट+४० ग्राम खनिज मिश्रण प्रमाणे द्रावण करून घ्यावे. हे द्रावण वाफ्यामध्ये टाकून अंदाजे १० सेंटीमीटर पर्यंत पाणी टाकून एकजीव मिश्रण तयार करावे.
 4. अझोला चे कल्चर टाकणे– अर्धा ते एक किलो ताजे अझोलाचे कल्चर समप्रमाणात पाण्यावर सोडावे.

 वाफ्याचा मेंटेनन्स-

 1. दर आठ दिवसांनी अंदाजे १.५  किलो ताजे शेण, ३० ग्राम सुपरफोस्फेट व ३० ग्राम खनिजमिश्रण चांगले मिसळून वाफ्यात सोडावे.
 2. दर १५ दिवसांनी वाफ्यातील २५ ते ३०% पाणी काढुन व ताजे पाणी भरावे.
 3. दर २ महिन्यांनी वाफ्यातील ५  किलो माती काढुन नवीन माती टाकावी.
 4. दर सहा महिन्यांनी वाफा पूर्णपणे साफ करून नवीन तयार करावा.

आपण योग्य काळजी घेतली तर दररोज एका वाफ्यातून आपण अंदाजे १  ते १.५  किलो पर्यंत अझोलाचे उत्पादन घेऊ शकतो. अझोला काढत असताना 1 ते २ सेंटीमीटर छिद्र असलेली चाळणी वापरावी जेणेकरून लहान वाढीच्या अवस्थेत असणारा अझोला पाण्यात राहील.

रंगावरून अझोलाचा दर्जा कसा ओळखावा-

 1. हिरवागार ताजा अझोला- निरोगी
 2. विटकरी रंगाचा- प्रखर सूर्यप्रकाशामुळे
 3. तपकिरी किंवा लालसर गुलाबी- जास्त तापमान

अझोला खाऊ घालण्याची पद्धत-

वाफ्यातून काढलेल्या अझोला थेट खाऊ घालू नये, प्रथम तो बकेट मध्ये धुवून घ्यावा जेणेकरून शेणाचा वास निघून जाईल. सुरुवातीला इतर चारयासोबत १.१  प्रमाणात खाऊ घालावा व नंतर सवय झाल्यास स्वतंत्रपणे जनावरास खायला दिला तरी चालेल.

जनावर किलो (ग्राम) प्रती जनावर प्रती दिन
दुभत्या गाय, म्हैस १.५ ते २ किलो
वासरे ५०० ते ७०० ग्राम
शेळी, मेंढी ३०० ते ५०० ग्राम
कोंबडी २०ते ३० ग्राम

अझोलाचे फायदे-

 1. दुभत्या जनावरास खाऊ घातल्याने दुधाच्या उत्पादनात वाढ तर होतेच पण प्रोटीन मिळते व व दुधाचे SNF वाढते. (वाचा-दुधातील फॅट आणि SNF च्या वाढीचे/संतुलनाचे सोपे सूत्र)
 2. वासरांना दिल्यास चांगली वाढ होते.
 3. कोंबड्यांना खाद्यासोबत दिल्यास अंडी व वजनामध्ये वाढ होते.
 4. वाफ्यामधून काढलेले पाणी उत्कृष्ट खत म्हणून वापरात येते.

संभाव्य अडचणी व उपाय-

 1. अझोलाची वाढ न होणे– ३५ अंशापेक्षा तापमान पुढे गेल्यास अझोलाची वाढ थांबते अशा वेळी वाफ्यावर चांगली सावली तयार करावी.
 2. जनावरांनी अझोला न खाणे– नवीन चव असल्यामुळे कदाचित जनावरे सुरुवातीस अझोला खाणार नाहीत. अशा वेळी अझोला चांगला धुतलेला आहे का ते पहावे कारण शेणाचा वास पूर्णपणे निघून गेला पाहिजे.

अशा या किफायतशीर व सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी महागड्या पशुखाद्याचा पर्याय म्हणून अझोला उत्पादन घेऊ शकता व आपला खर्च वाचवू शकता.

(माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की share करा)

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!