स्वच्छ दुध उत्पादन

स्वच्छ दुध उत्पादन
        शेतकरी बंधुनो, आपला देश हा जगातील सर्वात जास्त दुध उत्पादन करणारा देश आहे. असे असले तरी दुधाच्या व दुग्धजन्य पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान समाधानकारक नाही कारण आपल्याकडील दुधाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मानांकनानुसार नाही. यामुळे निर्यातीतुन मिळणाऱ्या आर्थिक फायद्यास आपल्याला सातत्याने मुकावे लागत आहे. आता हे चांगल्या दर्जाचे दुध म्हणजे नेमके काय हा प्रश्न निश्चितच पडला असेल. सोप्या भाषेत चांगल्या दर्जाचे दुध म्हणजे ‘स्वच्छ’ दुध असे आपल्याला म्हणता येईल.

स्वच्छ दुध म्हणजे नेमके काय?
असे दुध की, जे निरोगी जनावरापासून मिळालेले असेल, स्वच्छ भांड्यात काढलेले व साठविलेले असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बाह्यघटक (कचरा, शेण, मूत्र, माती, चाऱ्याचे कण, धूळ, माश्या, भेसळ, प्रतीजैविकाचे अंश, रोगजंतू इ.) असणार नाहीत, त्याला नैसर्गिक गंध असेल, सुक्ष्मजीवांचे प्रमाण मर्यादेत असेल व पिण्यासाठी ते सुरक्षित असेल.
स्वच्छ दुधाची गरज ?
स्वच्छ दुधाचा फायदा हा केवळ त्याच्या ग्राहकास होतो असे नाही तर उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोबदला निश्चितच मिळतो.
१. पिण्यासाठी सुरक्षित असते- आपल्याला माहित असेलच की, कॉलरा, टायफोयीड, टी बी, हगवण इ रोगाचा प्रसार दुषित दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या माध्यमातून होतो. आपण जर स्वच्छ दुध उत्पादन प्रक्रिया अवलंबिली तर अशा रोगांच्या प्रसारास आळा बसू शकतो.
२. साठवण व वाहतूक क्षमतेत वाढ– चांगल्या प्रतीच्या व स्वच्छ दुधात सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी असते त्यामुळे साठवणीस अतिशय चांगले असते, तसेच लांब पल्ल्याच्या वाहतुकीत ते लवकर खराब होत नाही.
३. चांगला भाव– स्वच्छ दुधापासून उच्च दर्जाचे पदार्थ बनतात ज्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फायदा होतो.
. ग्राहकाचे समाधान– दुधाचा दर्जा जर सातत्याने चांगला असेल तर चांगली बाजारपेठ मिळते व ग्राहक टिकून राहतात याउलट जर दुध कमी दर्जाचे असेल तर मागणी कमी होऊ लागते, भाव पडतात व आर्थिक नुकसान होते.

दुध दुषित कसे होते ?
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे विविध घटक दुधाचा दर्जा खालावण्यास कारणीभूत ठरतात.

स्वच्छ दुध उत्पादनासाठी दैनंदिन व्यवस्थापनात करावयाच्या सुधारणा-
चांगल्या दर्जाचे दुध मिळविण्यासाठी फार मोठ्या तंत्रज्ञानाची व खूप मोठ्या खर्चिक गोष्टी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण दैनंदिन व्यवस्थापन करत असताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे व त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे.
१. निरोगी जनावर– जनावर जर निरोगी असेल तर अपोआप त्यापासून मिळणारे दुध देखील चांगल्या दर्जाचे असेल. जनावरात प्रामुख्याने कासदाह /mastitis/ दगडी रोग आढळतो. ज्यामध्ये कासेला सूज येते त्यामुळे त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा दर्जा ढासळतो. याखेरीज जनावरास जर टी बी, बृसेल्ला यासारखे आजार झालेले असतील तर दुधामध्ये हे रोगजंतू येतात. जनावरांना जर खुराचे आजार असतील तर त्याचा दुधावर विपरीत परिणाम होतो असे संशोधनात सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आजारी जनावरचे योग्य वेळी रोगनिदान व उपचार केल्यास वरील गोष्टी टाळता येतात.
२. जनावराची स्वच्छता– जनावराचे मागील पायाचा व कासेचा भाग हा दुध काढतेवेळी स्वच्छ असला पहिजे. या भागास सतत शेण व मूत्र चिकटलेले असते जर ते दुधात मिसळले तर दुध दुषित होते. त्यामुळे दुध काढण्याच्या आधी जनावर स्वच्छ करणे आवश्यक आहे. शेपटीचे केस जर व्यवस्थित कापले तर दुधामध्ये जनावराचे शेण व मूत्र उडून येत नाही.
३. आदर्श गोठा– जनावराचा गोठा हा भरपूर हवा खेळती राहणारा, पुरेसा प्रकाश असणारा, स्वच्छ पाणी पुरवठा असणारा असावा. गोठ्यातील जमिन शक्य तेवढी कोरडी ठेवावी, गोठ्यात जनावराची जास्त गर्दी करू नये. मुक्त संचार गोठ्यात बऱ्यापैकी स्वच्छता राहू शकते.
४. दुधाची भांडी– दुधाची भांडी ही शक्यतो स्टेनलेस स्टिल ची असावीत जेणेकरून ती साफ करायला सोपे जाते. भांड्याचे तोंड हे अरुंद असावे, भांड्यांना जोड कमी असावेत कारण जोड असलेल्या ठिकाणी सफाई करणे अवघड असते. भांडी उष्ण पाण्याने व योग्य साबण/पावडर वापरून धुवावीत व कोरडी झाल्यावरच वापरावीत.
५. दुध काढण्याची पद्धत– दुध काढण्यासाठी जर मिल्किंग मशीन चा वापर होत असेल तर कंपनीने दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. हाताने दुध काढावयाच्या प्रामुख्याने ३ पद्धती आहेत.
a. पहिली पद्धत म्हणजे stripling method यामध्ये हाताच्या अंगठा सडावरती वरून खाली घसरत आणून दाब देऊन दुध काढले जाते.
b. दुसऱ्या पद्धतीत म्हणजे knuckling method मध्ये हाताचा अंगठा सडावर रुतुवून दाब दिला जातो व दुध काढले जाते. या दोन्ही पद्धती मध्ये सडावर जास्त दाब पडतो व स्तनदाह होण्याचे प्रमाण वाढते. या पद्धतीमुळे दुध काढणाऱ्या व्यक्तीच्या अंगठ्याला सुद्धा गाठी आलेल्या आपण पाहिलेल्या असतीलच.
c. यापेक्षा तिसरी पद्धत म्हणजे full hand method मध्ये सडाला मुठीत पकडून एकसमान दाब दिला जातो दुध काढले जाते. या तिसऱ्या पद्धतीमध्ये जनावराच्या सडाला इजा होत नाही.
त्यामुळे full hand method व शेवटच्या धारा stripling method ने काढल्यास दुधाला चांगले fat लागते (fat हलके असल्याने ते कासेमध्ये वरच्या भागात तरंगत असते त्यामुळे ते सर्वात शेवटी सडाकडे येते).
याशिवाय दुध काढतेवेळी पहिल्या काही धारा वेगळ्या भांड्यात घाव्यात. या पहिल्या धारांमध्ये सूक्ष्म जीवांचे प्रमाण सर्वात जास्त असते. तसेच हे पहिले दुध कासदाह रोगाचे निदान करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
दुध काढत असताना छोटा स्टूल किंवा खुर्ची अवश्य वापरावी जेणेकरून आरामात दुध काढता येते व घाईघाईत जनावराच्या सडाला अनावश्यक ताण येत नाही.
६. दुध काढणाऱ्या व्यक्तीच्या सवयी-दुध काढणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे, दुध काढण्यापूर्वी साबणाने हात धुवून कोरडे करावेत, तंबाखू,गुटखा, खर्रा, यासारखे पदार्थाचे सेवन करू नये, दुध काढत असताना अनावश्यक बोलणे, खोकणे, शिंकणे इ गोष्टी टाळाव्यात.
७. कासेची काळजी– कास हा दुध निर्मितीचा अवयव असल्याने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दुध काढायला सुरुवात केल्यास ७ मिनिटाच्या आत दुध काढले पाहिजे. दुध काढत असताना कासेत दुध अजिबात शिल्लक ठेऊन नये अथवा कासदाह होण्याचे प्रमाण वाढते. तसेच दुध काढण्यापुर्णी व काढल्यानंतर सडाला जंतुनाशक औषध फवारणे/लावणे आवश्यक आहे. दुध काढून झाल्यावर सडाची तोंडे काही मिनिटे उघडी असतात या काळात जर याचा गोठ्यातील शेण किंवा मुत्रासोबत संबंध आला तर जंतुसंसर्ग होतो त्यामुळे जनावराला दुध काढल्यानंतर लगेच बसू देऊ नये.

कृपया LIKE/COMMENT/SHARE

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!