पावसाळ्यात आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्याल?

पावसाळ्यात आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्याल?
             शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यातील दमट वातावरण रोगजंतूंच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते. मोठ्या पावसानंतर पुराची व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा वातारणात खालीलप्रमाणे समस्या होऊ शकतात.
 1. पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान होते व त्याचा परिणाम म्हणून चारा टंचाई निर्माण होणे.
 2. दमट वातावरणात बुरशीची वाढ लवकर होते, खाद्याला विषारी बुरशीची लागण झाल्यास त्याच्यातील पोषक घटक कमी तर होतातच पण असे खाद्य जनावरांना दिल्यास विषबाधा होणे, हगवण यासारखे दुष्परिणाम सुरु होतात.
 3. पुराच्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी गढूळ होते व बऱ्याच वेळा त्यामध्ये जर घाण असेल तर जनावरे पाणी पीत नाहीत. त्यामुळे वरवर जरी भरपूर पाणी उपलब्ध आहे असे वाटत असले तरी ते पिण्यायोग्य नसल्यामुळे जनावराच्या शरीरात पाण्याची कमतरता (dehydration) निर्माण होते.
 4. जमिनीवर जर खूप काळ, चिखल, पाणी असेल तर खुराच्या समस्या निर्माण व्हायला सुरुवात होतात. यामुळे खुरामध्ये जखमा होणे, अळ्या पडणे, जनावर लंगडणे असे प्रकार सुरु होतात.
 5. पावसाळी वातावरणात माश्या, कीटक यांचे प्रमाण खूप वाढते यापैकी काही कीटक व माश्या ह्या जनावरात रोगजंतूचा फैलाव करण्याचे काम करतात.
 6. पावसाळी दिवसात मेंढ्यामध्ये शरीरावरील केस (लोकर) ओली होतात व त्यामुळे परजीवी आकर्षित होतात.
 7. पावसाळ्यात वातावरणाचे तापमान कमी झाल्यामुळे लहान वासरे, तसेच शेळ्या-मेंढ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढते यामध्ये प्रामुख्याने न्युमोनिया सारख्या आजाराची लागण होते व मरतुक होऊ शकते.
 8. दमट वातावरण जंताची/परजीवी कीटकांची अंडी व अळ्या यासाठी पोषक असते. त्यामुळे जंत व बाह्यपरजीवी यांचे प्रमाण वाढते.
 9. उन्हाळ्यात हिरवा चाऱ्याचा अभाव असतो व पाऊस पडला की लगेच मोठ्या प्रमाणात हिरवा चारा तसेच घास उपलब्ध होतो व तो जर अमर्यादित स्वरुपात जनावरास खायला दिला तर पोटफुगी, हगवण यासारखे प्रकार सुरु होतात.

वरील समस्या जरी १००% टाळणे शक्य नसले तरी आपण खालीलप्रमाणे उपयोजना करून त्या कमी करू शकतो व आपल्या पशुधनाचे होणारे नुकसान टाळू शकतो.

 1. मोठ्या पावसाचा अंदाज असेल तर गोठ्यात/ गोदामात पुरेशा प्रमाणात चारा व इतर खाद्य उपलब्ध राहील असे पाहावे.
 2. खाद्य साठवणीची जागा शक्य तेवढी कोरडी ठेवावी ज्यामुळे विषारी बुरशी ची वाढ होणार नाही.
 3. जनावराच्या पाणीसाठ्यात पुराचे किंवा नाल्याचे गढूळ पाणी मिसळणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. जर असे पाणी मिसळेले असेल तर जनावरास शक्य तेवढे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करावा व जनावर प्रत्यक्षात पाणी पीत आहे का हे ही जरूर तपासावे जेणे करून त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही.
 4. गोठ्यातील जमिनीवर चिखल/पाणी/ओलावा कमीत कमी राहील याकडे पाहावे. जर जनावर लंगडत आहे असे दिसल्यास ताबडतोब त्याचा उपचार करून घ्यावा.
 5. लहान जनावरे, शेळ्या-मेंढ्या यांना उबदार जागी/बंदिस्त ठिकाणी ठेवावे जेणेकरून थंड वातावरणामुळे ते आजारी पडून मरतुक होणार नाही.
 6. जनावरातील जंत नियंत्रणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी यासाठी वेळापत्रकाप्रमाणे नियोजन करावे.(वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा)
 7. जनावराना निव्वळ हिरवा चारा न देता काही प्रमाणात कोरडा चारा/कडबा खायला द्यावा जेणेकरून त्याची पचनक्रिया व्यवस्थित राहील.
 8. आपल्या जनावरांना लसीकरण झालेले आहे का ते पाहावे(अधिक माहितीसाठी क्लिक करा)
 9. सर्वात महत्वाचे म्हणजे एखादे जनावर आजारी पडले तर त्याचे पशुवैद्याकडून त्वरित उपकार करून घ्यावे
माहिती आवडली असेल तर लाईक/share करा; शंका/समस्या असतील तर खाली कमेंट करा.
Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!