रेबीज/पिसाळणे- प्रतिबंध हाच उपाय

रेबीज/पिसाळणे- प्रतिबंध हाच उपाय
         ‘आमच्या गाईला पिसाळलेला कुत्रा चावला हो! काय करावं काही कळेना!’ हा अतिशय सामान्य पण चिंतेने विचारला जाणारा प्रश्न. रेबीज  जरी अतिशय घातक आणि जीवघेणा रोग असला तरी आपण काही गोष्टी पाळल्या तरी त्याचा १००% प्रतिबंध करता येणे शक्य आहे.

रेबीजचा जंतू – रेबीज हा ‘लायसा’ नावाच्या विषाणूमुळे (virus) होणारा आजार आहे,  ज्याचा आकार बंदुकीच्या गोळीसारखा असतो. हा विषाणू घातक असला तरी तो अतिशय नाजूक आहे, म्हणजे अगदी सूर्यप्रकाश, कोरडेपणा, दैनंदिन वापरातील साबण यासारख्या गोष्टीमुळे तो निष्क्रिय होतो.

रेबीज कोणाकोणाला होऊ शकतो– सर्व उष्ण रक्ताचे प्राणी जसे की, कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळ्या,मेंढ्या, वन्यप्राणी, माणूस इ.

रोगप्रसार– हा विषाणू मुख्य करून रोगी प्राण्याच्या (प्रामुख्याने कुत्रा) लाळेतून परसतो. ज्या वेळेस पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा इतर प्राण्याला चावतो त्या वेळी झालेल्या जखमेतून रेबीजची लागण होते. त्वचेवरील जखमेसोबत लाळेचा संपर्क आल्यास तसेच डोळे, नाक व तोंडाद्वारे देखील लागण होण्याचा धोका असतो. लाळेव्यतिरिक्त या रोगाने मेलेल्या प्राण्याच्या मेंदू किंवा मज्जासंस्था यासोबत जर संपर्क (उदा. कत्तलखाण्यात काम /मांस विक्री करणारे लोक) आला तर हा रोग होऊ शकतो. हा विषाणू केवळ मज्जासंस्थेत जिवंत राहणारा आणि वाढणारा आहे, त्यामुळे रोगी प्राण्याचे मल, मूत्र, रक्त यांच्यामार्फत याचा प्रसार होत नाही.

 रोगप्रसाराची महत्वाचे माध्यमे

 • रोगी प्राणी चावल्यास– जर प्राण्याचे दात त्वचेमध्ये रुतले असतील व जखम झाली असेल तर हा रोग होऊ शकतो. साधारणपणे जखम किती खोल आहे, शरीराच्या कुठल्या भागावर आहे या गोष्टी रोगाची लागण किती कालावधीत होईल हे ठरवतात. चावण्याचे दोन उपप्रकार पडतात, पहिला म्हणजे विनाकारण चावणे- ज्यामध्ये आपण प्राण्याला हाताळत नाही किंवा खायला घालत नाही किंवा कसलाच संवाद साधत नाही, तरीही तो अचानक चावतो. अशा प्रकारात तो रेबीजने बाधित असल्याची शक्यता खूप दाट असते. चावण्याचा दुसरा प्रकार- म्हणजे त्याच्याशी खेळत असताना दात लागले असतील, किंवा त्याला हाताळत असताना, खायला घालत असताना जर तो चावला तर मात्र तो रेबीजमुळे असेल याची शक्यता खूप कमी असते.
 • इतर संपर्क– रोगी प्राण्याच्या लाळेचा आणि मेंदू/ मज्जासंस्थेतील अवयवांचा जखमेशी, खरचटलेल्या भागाशी किंवा डोळ्याशी संपर्क आला तरी रेबीजचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या प्रकारात जरी रोग होण्याची शक्यता कमी असली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घेणे आवश्यक असते.

 रोगाची लक्षणे

 • कुत्रा– लक्षणाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे उग्र/हिंसक/क्रुद्ध प्रकार, यामध्ये कुत्रा हिंसक बनतो, तो बऱ्याच प्राण्यांना तसेच निर्जीव वस्तूंना चावत सुटतो, त्याच्या मालकाला ओळखत नाही, तोंडातून सतत लाळ गाळतो, पाणी पिऊ शकत नाही (गळ्याच्या स्नायूला अर्धांगवायू झाल्यामुळे). पाण्यापासून दूर पळणे, अतिसंवेदनशीलता (थोड्याशा आवाजाने दचकणे) अशी लक्षणे दिसतात. दुसरा प्रकार मूक स्वरूपाचा असतो. हा प्रकार शक्यतो उग्र प्रकारानंतर सुरु होतो. यामध्ये कुत्र्याचे तोंड कायस्वरूपी उघडे राहते, सतत लाळ गळत असते, तो उजेडात यायला घाबरतो, पाण्याला घाबरतो, मालकाला ओळखत नाही, एकटक पाहत राहतो (शून्यात पाहणे).
 • इतर जनावरातील लक्षणे– गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या प्राण्यामध्ये कुत्र्यापेक्षा थोडी वेगळी लक्षणे आढळतात. या प्राण्यामध्ये सतत जांभया देणे, बेचैनी, पाणी न पिणे, चारा न खाणे, इतर प्राण्यावर किंवा निर्जीव वस्तूवर हल्ला करणे, रवंथ बंद होणे ही लक्षणे आढळतात.

 पिसाळलेला कुत्रा चावल्यास काय करावे-प्रथमोपचार

 • जखम धुणे- सर्वप्रथम ज्या ठिकाणी कुत्रा चावला आहे ती जखम तात्काळ स्वच्छ पाण्याने आणि साबणाने (लाईफबॉय) भरपूर फेस करून साधारणपणे १५ मिनिटे धुवून घ्यावी जेणेकरून लाळेतील विषाणू निष्क्रिय होईल व लागण होण्याचा धोका खूप कमी होईल.
 • जखम धुवून झाल्यावर त्यावर आयोडीन सारखे जंतुनाशक लावावे.
 • त्वरित डॉक्टर/पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण (वेळापत्रकानुसार) करून घ्यावे.

 प्रतिबंध कसा करता येईल

 • आपण जर कुत्रा पाळला असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून त्याला रेबीज प्रतिबंधक लस टोचून घ्यावी कारण कुत्रा हा रेबीजच्या प्रसारातील सर्वात महत्वाचा प्राणी आहे.
 • जर आपल्याकडे असणाऱ्या प्राण्यामध्ये वरील लक्षण दिसून येत असतील, तर अशा प्राण्याला त्वरित वेगळे करून बांधावे किंवा बंद खोलीत ठेवावे आणि पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
 • कत्तलखाण्यात काम करणाऱ्या लोकांचा संपर्क मेंदू आणि तत्सम अवयवांशी येत असल्यामुळे त्यांनी प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.
 • जर रेबीज झालेल्या प्राण्याशी संपर्क आला आहे असे वाटत असल्यास तात्काळ लसीकरण करून घ्यावे.
 • रेबीज झालेल्या प्राण्याची लाळ जर जमिनीवर पडली असेल, तर जंतुनाशक रसायन किंवा साबण, कपडे धुण्याची पावडर वापरून ती जागा स्वच्छ करावी.
 • रेबीज दुधावाटे पसरू शकतो किंवा नाही याबाबत निश्चित सांगता येत नाही, त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी कच्चे दुध पिऊ नये. तसेच वरील लक्षणे असलेल्या गाई/म्हशीला वासराला पाजू नये. त्याचबरोबर रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

                 आपणा सर्वांना रेबीज रोगाविषयी योग्य माहिती असणे त्याच्या प्रतिबंध करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या रोगाला न घाबरता त्याविषयी समजून घेतल्यास आपण आपले आणि आपल्या पशुधनाचे रक्षण करू शकतो.

त्यामुळे like, comment आणि आपल्या मित्रांना  share करा

 

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!