श्वानामधील उलटीची समस्या व उपाय

श्वानामधील उलटीची समस्या व उपाय

                   आपल्याकडे असलेला कुत्रा जणू काही आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असतो. कधी कधी अचानक त्याला उलटीचा त्रास सुरु होतो, व तो सहजासहजी थांबत नाही. अशा वेळी नेमके काय करावे? कोणत्या उपाययोजना कराव्यात हे आपल्याला सुचत नाही. सर्वसाधारणपणे नको असलेले काहीतरी खाल्ले की, ते बाहेर काढण्यासाठी प्राणी उलटी करतात हा आपला सर्वांचा समज. पण बऱ्याच वेळी उलटी करण्यामागचे कारण यापेक्षा वेगळे आणि गंभीरही असू शकते. त्यामुळे या समस्येकडे डोळेझाक करणे धोक्याचे ठरू शकते.

गुळणी आणि उलटी– या दोन एकसारख्या वाटणाऱ्या पण वेगवेगळ्या समस्या  आहेत. गुळणी ला इंग्रजीत regurgitation असे म्हणतात यामध्ये पोटाची हालचाल अजिबात नसते किंवा अतिशय कमी असते. या उलट प्राणी जेंव्हा उलटी करतो त्या वेळी पोटाची हालचाल मोठ्या प्रमाणात होत असते. अन्ननलिकेमध्ये काही रोग उत्पन्न निर्माण झाल्यास गुळणी येते तर पोटाच्या समस्येमध्ये उलटी होते.

उलटी होण्यामागची कारणे– उलटी होणे हे निसर्गाने प्राण्याला दिलेल्या देणगीप्रमाणे आहे, कारण शरीरास बाधक असणारे खाद्यपदार्थ पोटात गेल्यावर ते बाहेर काढण्यासाठी उलटी येते. याखेरीज ज्याप्रमाणे माणसाला प्रवासामध्ये मळमळते त्याचप्रमाने कुत्र्यामध्ये देखील प्रवास झाल्यावर ही समस्या होऊ शकते.

याखेरीज पचनसंस्थेला सूज असेल, गाठी आल्या असतील, मदुमेह, किडनी/लिवरचे आजार, जंत, औषधाची अलर्जी, डोक्याला झालेली दुखापत इ. मुळे देखील कुत्र्यांमध्ये उलट्या होऊ शकतात.

उलटीचे निरीक्षण–  ज्यावेळी आपला कुत्रा उलटी करतो त्या वेळी आपण थोडे निरीक्षण केले तर आपल्याला काही प्रमाणात त्यामागिल कारणाचा अंदाज येऊ शकतो. उदा. जर उलटीमध्ये फेसाचे प्रमाण जास्त असेल तर समजू शकतो की त्याचे पोट रिकामे आहे, फेसामध्ये जर पिवळसर पदार्थ आढळत असेल तर ते acidity मुळे असू शकते. उलटीमध्ये जर लालसर किंवा कॉफीच्या रंगाचा पदार्थ असेल तर ते  त्याच्या पोटात किंवा आतड्यामध्ये झालेल्या रक्तस्त्रावामुळे असते. याबरोबरच जर उलटी हिरव्या किंवा अन्य वेगळ्या रंगाची असेल तर आपल्या कुत्राने काहीतरी विषारी पदार्थ खाल्लेला आहे असे समजावे. लहान पिल्लामधील उलटीची कारणेदेखील हीच असतात परंतु त्यांचे वय कमी असल्याने त्यांची शारीरिक क्षमता कमी असते. उलटीमुळे शरीरातील पाणी कमी होते व लहान पिल्लं हे सहन करू शकत नाहीत व वेळेत उपचार न केल्यास लवकर दगावतात.

अशा वेळी नेमके काय करावे?

  • उलटीचे लक्षण सुरु झाल्यास ६ ते ८ तासापर्यंत काहीही खायला ठेऊ नये.
  • या कालावधीत त्याला अगदी थोडेसे पाणी द्यावे, त्याने पाणी उलटीवाटे बाहेर काढले नाही तर त्याला जास्त पाणी प्यायला देऊ शकता.
  • १२ तासानंतर त्याला थोडासा भात (व शिजवलेले चिकन) खायला द्यावे, जर त्याला उलटी झाली नाही झाली तर याचे प्रमाण व इतर खाद्य हळूहळू वाढवावे व पूर्वीसारखे खायला द्यावे.
  • यानंतर पुन्हा उलटी झाली तर मात्र दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे आहे असे समजावे व उपचार करून घ्यावेत.

उपाययोजना 

  • आपल्या कुत्र्याचे खाद्य अचानक बदलू नये, असे केल्यास पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, जर खाद्य बदलायचे असेल तर हळूहळू करून ४-५ दिवसात बदलावे.
  • कुत्र्यासाठी खेळणी विकत घेत असताना चांगल्या दर्जाचे घ्यावेत, कारण दाताने चावल्यास खेळण्याचा तुकडा पोटात जातो व गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
  • त्याच्या खाद्यामध्ये हाडे असू नयेत कारण त्याचे तुकडे अन्ननलिकेमध्ये आणि पोटामध्ये इजा करू शकतात.
  • बाहेरील, रस्त्यावरील, उकीरड्यावरील खराब झालेले अन्न खाऊ देऊ नये यामधून बऱ्याच प्रकारच्या रोगांची लागण व गंभीर विषबाधा होण्याची शक्यता असते.
  • बाहेर फिरवायला घेऊन जात असताना तोंडाला बांधायची जाळी (muzzle) वापरावी.

अशाप्रकारे आपण आपल्या इमानी आणि प्रिय सवंगड्याची काळजी घेऊ शकता.

बरं, कुत्रा कधी कधी गवत का खातो माहितीय का कुणाला ????

आपल्या प्रतिक्रिया कळवा

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!