जनावरातील पावसाळ्यापूर्वीचे लसीकरन

जनावरातील पावसाळ्यापूर्वीचे लसीकरन

 मित्रांनो,

यावर्षीच्या पावसाच्या आगमनाचे अंदाज बांधणे सुरु झालेले आहे. पावसाळ्याच्या आगमनासोबतच अनेक रोगजंतू सुद्धा आपल्या जनावरांना विविध रोगांची लागण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरण अनेक रोगजंतूच्या (विषाणू आणि जीवाणू) वाढीसाठी अतिशय पोषक असते. तसेच या वातावरणात त्यांचा प्रसारही अतिशय वेगाने होतो. अशा या रोगांवर एकतर रामबाण उपचार उपलब्ध नाहीत व जे आहेत  त्यावर होणारा खर्च तुलनेने खूप जास्त आहे, तसेच हे उपचार करून रोगामुळे आपल्या जनावरांची गेलेली उत्पादन क्षमता पूर्वपदावर येईल याचीही शाश्वती कमीच आहे.

मग आता साहजिकच या रोगांपासून बचाव कसा करायचा हा प्रश्न आपल्या मनात आला असेल.आपल्या जनावरांना मॉन्सूनपूर्व लसीकरण करून घेणे हेच या प्रश्नाचे समाधान होय.

लसीकरण का करावे?

१. जनावरांना दुर्धर आजारांपासून वाचवण्यासाठी

२. रोगामुळे होणाऱ्या उपचारावरील खर्च टाळण्यासाठी

३. जनावरांचे आरोग्य व उत्पादन (प्रमाण व गुणवत्ता) यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

१. अतिशय लहान वयाच्या जनावरास लस देणे शक्यतो टाळावे

२. अशक्त जनावरांना जिवंत सूक्ष्मजीव असणाऱ्या लसी (live vaccine) देणे टाळावे

३. आजारी, तसेच गाभण जनावरांना लस देणे टाळावे

पावसाळा सुरु होण्यापूर्वी द्याव्या लागणाऱ्या लसी कोणत्या ?

१. घटसर्प (HS)- तोंडावाटे व श्वासावाटे ह्या रोगाचा प्रसार होतो. ह्या रोगामध्ये जनावराला ताप येतो तसेच  गळ्याला मोठी सूज येऊन, श्वास न घेता आल्यामुळे जनावर अल्पावधीतच  दगावते. आपल्याकडील गाई व म्हशीना याची लस देणे आवश्यक आहे.

२. फऱ्या  (BQ)- तोंडावाटे व जखमेमधून ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगामध्ये जनावराच्या पायाच्या स्नायूला सुज येते त्यामुळे जनावर लंगडत चालते. तसेच ह्या रोगाचे जीवाणू शरीरामध्ये विषद्रव्य सोडतात त्यामुळे जनावर दगावते. आपल्याकडील गाई व म्हशींना ह्या रोगाला प्रतिबंध करणारी लस द्यावी.

३. आंत्रविषार (ET)– हा जीवाणूजन्य आजार शेळ्या व मेंढ्यानी पावसाळ्यात उगवलेले  गवत मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यामुळे होतो. या रोगात जनावराचे पोट फुगणे, हगवण लागणे असे प्रकार सुरु होतात. जनावर स्वतः भोवती गोल गोल फिरू लागणे (Circuling) हे या रोगाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

 लसीकरण अपयशी होण्याची कारणे

१. ज्या वेळी लस दिली जाते त्या वेळी जनावराच्या शरीरात प्रतीपिंड (antibodies) तयार होत असतात. आणि सर्वांची प्रतीपिंड तयार करण्याची क्षमता समान नसते किंबहुना जर जनावरामध्ये अनुवांशिक दोष असेल  तर प्रतीपिंड तयारच होत नाहीत.

२. लसीसोबत प्रतिजैविकांचा वापर केल्याने.

३. चुकीच्या प्रकारची लस दिल्यामुळे

४. लसीची योग्य मात्रा योग्य मार्गाने न दिल्यामुळे .

आपण काय केले पाहिजे?

. जंतनिर्मुलन -आपल्या पशूच्या शरीरात/पोटात जर जंत असतील तर प्रतीपिंड योग्य प्रमाणात तयार होत नाहीत त्यामुळे रोगाचा प्रतिबंध होऊ शकत नाही. हे टाळण्यासाठी लस देण्यापूर्वी  अंदाजे १० ते १५ दिवस आधी जनावराला जंताचे औषध पाजावे जेणेकरून त्याचे शरीर लसीकरणासाठी तयार होईल.

२. पशुवैद्यकाच्या संपर्कात रहावे व लस उपलब्ध झाल्यास तात्काळ टोचून घ्यावी.

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!