श्वानावर कृत्रिम रंगांचे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना  

श्वानावर कृत्रिम रंगांचे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना  
     मित्रांनो होळी, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा आपला सर्वांचा आवडता रंगांचा सण. आपण आपल्या कुटुंबासोबत,मित्रांसोबत खूप धमाल करतो पण त्याच वेळी आपल्या घरात असणाऱ्या किंवा आपल्या परिसरातील कुत्र्यांना देखील ह्या मस्ती मध्ये कळत- नकळत सामील करून घेतो. पण आपल्याला माहित आहे का, कृत्रिम रंगाचे परिणाम हळूहळू होतात व बरेच दिवस राहतात त्यामुळे कुत्रांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होऊ नाहक त्यांचा बळी जातो.

कृत्रिम रंगांचा होणारा दुष्परिणाम

१.     अलर्जी, त्वचेवर खाज येणे, केस गळणे, जखमा देखिल होऊ शकतात.

२.     रंगाने भरलेले फुगे मारल्यास, तसेच कोरडा रंग जरी डोळ्यात गेला तर तात्पुरते किंवा कायमचे आंधळेपण येऊ शकते.

३.     कोरडा रंग जर नाकावाटे फुफुसात गेला तर श्वासाचे विकार होतात.

४.     अंगावर पडणारा रंग साधारणपणे कुत्रे चाटतात, त्यामुळे तो पोटात जाऊन जठरात व आतड्याला मोठी हानी करतो कारण कृत्रिम रंगात अनेक विषारी रसायने असतात व उलटी, संडास यासारख्या समस्या सुरु होतात.

५.     याचबरोबर मोठ्या आवाजात आपण गाणी पण लावतो त्याचाही कुत्रांच्या कानावर मोठा दुष्परिणाम होतो.

हे सर्व कसे टाळता येईल

१.     आपल्या पाळीव कुत्रांना घरातच ठेवा बाहेर फिरायला घेऊन जाऊ नका तसेच आपल्या परिसरातील जी कुत्री असतील त्यांच्या अंगावर देखील रंग टाकू नका (कारण त्यांची काळजी करणारे आणि नंतर इलाज करणारे कुणीही नसते).

२.     विशेष करून लहान मुलांना ह्या गोष्टी समजवून सांगा, त्यांना परावृत्त करा कारण उत्साहाच्या भरात नकळत ते प्राण्यासोबत रंग खेळतात.

३.     आपल्या कुत्रांना ज्या भांड्यात पाणी आणि अन्न दिले जाते त्याकडे लक्ष ठेवा कारण चुकून पाण्यात किंवा अन्नात जरी रंग मिसळला तरी वरील समस्या होऊ शकतात. तसेच प्राण्याच्या आसपास रंगाचे पुडे, रंगाचे पाणी ठेवू नका.

४.     जर आपल्याला रंगपंचमी खेळायची असेलच तर रंगाच्या जागी हळद वापरू शकता पण ते ही अगदी थोड्या प्रमाणात.

५.     डोळ्यात जर रंग गेला तर आपण मुबलक स्वच्छ पाणी वापरून तो धुवून काढा.

६.     प्राण्याच्या अंगावर जर रंग पडला असेल तर चांगला डॉग शाम्पू वापरून तो लवकर धुवून काढा. रॉकेल, स्पिरीट, खोबरे तेल अशा गोष्टी रंग काढण्यासाठी अजिबात वापरू नका.

७.     इमर्जन्सी असेल तर मात्र तज्ञ पशुवैद्यकाकडून सल्ला आणि उपचार करून घ्या.

लक्षात ठेवा, रंगपंचमी हा माणसांचा सण आहे, मुक्या प्राण्यांचा नाही, त्यांच्यावर दया करा. तुम्हीही काळजी घ्या, शक्यतो नैसर्गिक रंग वापरा आणि खूप मजा करा.  Happy Holi..!!

 (लेखक-डॉ. अंबादास माडकर, MVSc, PhD) 

आपल्याला वरील माहिती महत्वाची आहे असे वाटत असल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांसोबत facebook वर नक्की share करा. शंका असतील तर कमेंट बॉक्स वापरा.
Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!