Sex Sorted Semen (लिंग वर्गीकृत रेतमात्रा)

Sex Sorted Semen (लिंग वर्गीकृत रेतमात्रा)

 

                        पशुधनाच्या पैदासीच्या व्यवस्थापनात कृत्रिम रेतनाला असलेले अनन्यसाधारण महत्व आता सर्वांनाच माहित झाले आहे. कृत्रिम रेतनाच्या सहाय्याने तयार होणारी चांगली जातिवंत वासरे व त्यांच्यामार्फत वाढलेल्या दुध उत्पादनामुळे पशुपालकांची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारली आहे. आपल्याकडे असणाऱ्या पशुधनाच्या विविध जातींमध्ये काही जाती या शेतीकामासाठी उपयुक्त आहेत तर काही दुध देणाऱ्या जाती म्हणून ओळखल्या जातात. उदा. खिल्लार नर हे शेतीकामासाठी चांगले मानले जातात तर मुऱ्हा म्हशी दुध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कृत्रिम रेतनातून जन्मणारे वासरू हे नर असणार की मादी, यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बऱ्यापैकी अवलंबून असते. त्यामुळे बहुतेक पशुपालकांना असा प्रश्न असतो की,   अशी काही पद्धत आहे का, जी वापरली तर नर किंवा मादी वासरूच निश्चितपणे जन्माला येईल? होय असे होणे शक्य आहे!!

काय आहेत लिंग वर्गीकृत रेतमात्रा- साधारणपणे विर्यात X आणि Y या दोन्ही प्रकारचे शुक्राणू असतात. ज्या वेळी नैसर्गिक/कृत्रिम रेतन केले जाते त्यावेळी जर मादीच्या बीजांडासोबत X प्रकारचे शुक्राणूचे मीलन झाले तर होणारे वासरू हे मादी जन्मते. याउलट जर Y प्रकारच्या शुक्राणूमार्फत मीलन झाले तर नर वासरे जन्मतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रेतमात्रामधून नर किंवा मादी जन्मण्याची शक्यता ५० : ५० असते. आता उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून जनावराच्या वीर्यावर प्रक्रिया केली जाते व त्याच प्रक्रियेतून X व Y प्रकारचे शुक्राणू वेगळे करता येऊ शकतात, यालाच लिंग वर्गीकृत रेतमात्रा किंवा इंग्रजीमध्ये Sex Sorted Semen असे म्हणतात. ह्या प्रकारच्या रेतमात्रा जर वापरल्या तर आपल्याला हवे असलेले वासरू होण्याची शक्यता जवळपास ९५% पर्यंत असते असा दावा संशोधक करतात.

भारतातील चित्र– भारतामध्ये २००९ पासून प्रायोगिक तत्वावर अशा प्रकारच्या विर्यामात्रा वापरल्या जात आहेत. सुरुवातीला पंजाबमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांवर याचा प्रयोग करण्यात आला व त्यातून समाधानकारक परिणाम दिसून आलेले आहेत. सध्या मेक इन इंडिया चळवळीत एनडीडीबी, बायफ, जे के ट्रस्ट इ संस्थामार्फत अशा प्रकारच्या रेतमात्रा उपलब्ध करून दिल्या जात असून, गरजेप्रमाणे विदेशातूनही त्यांची आयात केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गीर व मुऱ्हा या प्रकारच्या रेतमात्रा आहेत.

समज/गैरसमज-  या रेतमात्रांची किंमत किती असेल ते सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का? सध्याच्या परिस्थतीत या प्रकारच्या रेतमात्राचा मागणी व वापर कमी असल्यामुळे याची किंमत साधारण रेतमात्रापेक्षा जास्त असणार आहे, ती अंदाजे २००० रुपयाच्या आसपास असेल. परंतु यावर शासनामार्फत अनुदान मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांना एवढे पैसे मोजावे लागणार नाहीत. तसेच जसजसी मागणी वाढत जाईल तसे याची किंमतही कमी होणार हे निश्चित आहे.

ह्या रेतमात्रामध्ये असणाऱ्या शुक्राणूवर प्रक्रिया झालेली असल्याने त्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झालेला असेल का किंवा त्यामुळे जन्मणाऱ्या वासरांवर काही अपाय होऊ शकतो का? अशा प्रकारचे वीर्य तयार करण्यासाठी जरी वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या जात असतील तरी शुक्राणूच्या मिलनाच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत नाही ती तशीच टिकून राहते. तसेच याद्वारे जन्मलेली वासरेसुद्धा साधारण कृत्रिम रेतनातून जन्मलेल्या वासराप्रमाणेच आहेत, त्यामुळे हा केवळ गैरसमज आहे असेच म्हणता येईल.

आपल्या शंका/प्रतिक्रिया कळवा .

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!