कुक्कुटपालन- पक्षीगृहात पिल्लं आणण्यापूर्वी खालील १० गोष्टी आवश्य तपासा

कुक्कुटपालन- पक्षीगृहात पिल्लं आणण्यापूर्वी खालील १० गोष्टी आवश्य तपासा
                मित्रांनो, मागील भागामध्ये आपण कुक्कुटपालनाविषयी शेड, पाण्याची व्यवस्था, भांड्यांची खरेदी इ. पायाभूत गोष्टी पहिल्या. कोंबडीच्या पिल्लांचे वय अगदीच कमी असल्यामुळे त्यांची वाढही झालेली नसते, त्यामुळे योग्य ती व्यवस्था केली नाही तर त्यांची मरतुक सुरु होते व ती थांबवणे अवघड असते. त्यामुळे पिल्लं आणण्यापूर्वी आपण जर योग्य ती काळजी घेतली तर आपले होणारे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

खालील १० बाबीवर विशेष लक्ष द्यावे

१.      पिल्लांचे खाद्य– पिल्लं शेड मध्ये आणल्यापासून लगेचच त्यांना खाद्याची आवश्यकता असते. योग्य दर्जाचे प्री-स्टार्टर खाद्य आधीच मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्यास आयत्या वेळी होणारी पळापळी टाळता येऊ शकते.

२.      औषधे– वाहतुकीदरम्यान योग्य ती काळजी घेऊनही पिल्लांमध्ये जर अशक्तपणा तसेच मरतुक होण्यासारखी लक्षणे जर दिसू लागली  तर त्यावर नियंत्रण म्हणून करण्यासाठी आपल्याकडे जीवनसत्वे, क्षारमिश्रणे, प्रतिजैविके इ. औषधे उपलब्ध हवीत.पिल्लांना वाहतुकीदरम्यान ताण आलेला असतो त्यामुळे सुरुवातीस त्यांना जीवनसत्व पाण्यात मिसळून द्यावी लागतात.

३.      लसीकरन– पिल्लांमध्ये लसीकरन (अधिक माहितीसाठी क्लिक करा) फार लवकर सुरु करावे लागते, त्यामुळे गम्बोरो, लासोटा यासारख्या महत्वाच्या रोगांची लस फ्रीज मध्ये योग्य त्या तापमानास जतन करून ठेवावी.

४.      भुसा– शेडमध्ये जमिनीवर आच्छादन करण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे भुसा आहे. याचे साधारणपणे ३ ते ४ इंच जाडीचे आच्छादन करावे लागते. कारण लहानपणी पिल्लांची विष्ठा जर जमिनीवर तशीच पडून राहिली तर शेडमध्ये दुर्गंध येऊ लागतो व त्याचे दुष्परिणाम पिल्लांवर होतात. त्यामुळे खाली पडलेली विष्ठा लवकरात लवकर शोषून घेण्याचे काम भुसा करतो. परंतु भुसा मात्र स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा आहे का ते तपासावे.

५.      शेडची स्वच्छता– चांगल्या पाण्याने, योग्य ते निर्जंतुकीकरण करणारे औषध वापरून शेड मधील जमीन धुवून घ्यावी व त्यावर चुन्याचा पातळ लेप मारावा. ह्यामुळे जुनी घाण निघून जाते व रोगजंतू मरतात.

६.      शेडचे फुमिगेशन– यामध्ये फोर्मालीन आणि पोटाशीयम परमंग्नेट वापरून धूर तयार केला जातो. यासाठी शेड काही काळ हवाबंध अवस्थेत ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी पडदे वापरावेत.

७.      पिल्लांना ऊब देण्याची सोय (ब्रुडिंग)– पिल्लांची पिसे विकसित झालेले नसतात त्यामुळे त्यांना थंड वातावरणापासून धोका असतो. त्यांची मरतुक होऊ नये म्हणून लगेच त्यांना ऊब देण्याची सोय उपलब्ध असणे गरजेचे आहे. चांगल्या दर्जाचे ब्रूडर, किंवा बल्ब वापरून ऊब देता येऊ शकते (अधिक माहितीसाठी क्लिक करा).

८.     चिक गार्ड– लहान पिल्ले इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून पुठ्ठा किंवा पेपर वापरून चिक गार्ड बनवता येऊ शकते. यामध्ये जमिनीवर पेपर अंथरले तरी चालतात.

९.      पाण्याची व खाद्याची भांडी– स्वच्छ, चांगल्या दर्जाची, खाद्य आणि पाण्याची भांडी योग्य अंतरावर ठेवणे आवश्यक आहे. यामुळे पिल्लांची गर्दी होत नाही व चेंगराचेंगरी टाळता येऊ शकते तसेच सर्व पिल्लांना खाद्य आणि पाणी मिळते व त्यांची चांगली वाढ होते.

१०. शेडचे तापमान– पिल्लांना सुरुवातीच्या काळात शेडमध्ये  ९५ डिग्री फारेनहाईट एवढे तापमान आवश्यक असते. त्यासाठी तापमापक यंत्र तसेच  विजेचे बल्ब वापरू शकता.

आपल्याला वरील माहिती महत्वाची आहे असे वाटत असल्यास खालील बटन वापरून आपल्या मित्रांसोबत facebook वर नक्की share करा. शंका असतील तर कमेंट बॉक्स वापरा.

अधिक माहितीसाठी कुक्कुटपालन तज्ञ डॉ. सुरेश स्वामी यांचे व्हिडियो पहा

 

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!