ऊसाच्या वाड्यामुळे जनावरात होणारी ऑक्झालेटची विषबाधा व त्यावरील उपाययोजना

ऊसाच्या वाड्यामुळे जनावरात होणारी ऑक्झालेटची विषबाधा व त्यावरील उपाययोजना
                       शेतकरी बंधुनो, ऊसतोडीच्या हंगामात, ऊस  कारखान्यात जात असताना त्याला असलेले वाडे शेतातच वेगळे करून टाकले जाते. या वाड्याचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून केला जातो, जनावरेही ते आवडीने खातात. पण आपल्याला माहित आहे का, वाडे जास्त प्रमाणात जनावरांना खाऊ घातले तर जनावरांना विषबाधा होऊन त्यांचे उत्पादन कमी होते तसेच त्यांच्या जीवावरही बेतू शकते.

असे काय आहे ऊसाच्या वाड्यात?- आपणाला माहित आहेच की, जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी त्यांना हिरवा चारा खायला देणे आवशयक असते. हिरव्या चारयामध्ये अनेक घटक असतात त्यापैकीच ऑक्झालेट आणि नायट्रेट हे घटक आहेत. या दोन घटकाचे प्रमाण ऊसाच्या वाड्यात इतर हिरव्या चारयापेक्षा जास्त असल्याकारणामुळे आपल्या पशूच्या आरोग्यास यापासून बाधा होऊ शकते.

ऊसाच्या वाड्याचा पशूंचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम- मोठ्या प्रमाणांत जर ऊसाचे वाडे खाण्यात आले तर, प्राण्याच्या पोटात ऑक्झालेट जाते तिथून ते रक्तात शोषले जाते, त्या ठिकणी ते रक्तातील कॅल्सीयम सोबत संयोग पावते व त्यापासून न विरघळणारे (insoluble) कॅल्सीयम ऑक्झालेट तयार होते. यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे कॅल्सीयम ऑक्झालेट तयार होते व ते लघवीतून शरीराबाहेर टाकले जाते त्यामुळे शरीरातील कॅल्सीयमचे प्रमाण कमी होते. व दुसरा म्हणजे ह्या प्रक्रियेत जनावराच्या किडनीवर ताण येतो व तिची कार्यक्षमता कमी होणे व ती निकामी होणे असे प्रकार होऊ शकतात. याचा परिणाम प्रामुख्याने दुधाळ जनावरात दिसून येतो कारण दुध तयार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्सीयमची आवश्यकता असते.

प्रमुख लक्षणे

 • दुधाचा दर्जा व प्रमाण कमी होणे
 • गर्भपाताचे वाढलेले प्रमाण
 • जनावराचा झार वेळेत न पडणे
 • मायांग बाहेर येणे
 • दुर्बल, मुका, अनियमित माजाची लक्षणे
 • दुधाचा ताप (मिल्क फिवर)
 • अशक्तपणा येऊन बैलाची काम करण्याच्या क्षमता खालावणे

हे टाळण्यासाठी काय करता येईल

 • एक तर जनावरांना निव्वळ वाडे खाण्यास देऊ नये, वाड्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे व त्यासोबतच त्याला इतर खुराक, आंबोण, क्षारमिश्रणे, कडबा हे सुद्धा खायला घालावेत.
 • जर वाडे खाऊ घालण्याशिवाय पर्याय नसेल तर मात्र खालील सोपी पद्धत वापरून वाड्यातील ऑक्झालेट चे प्रमाण कमी करता येते. ही प्रक्रिया स्वस्त असून आपल्या परिसरात सहजपणे उपलब्ध असणारे साहित्य वापरून करता येते ही प्रक्रिया केल्यास वाड्यामधील ऑक्झालेट चुन्याच्या निवळीत असणाऱ्या कॅल्सीयम सोबत संयोग पावते व शरीरातील कॅल्सीयमच्या प्रमाणावर काही परिणाम होत नाही.
  1. लागणारे साहित्य- कळीचा चुना, मीठ, पाण्याचे पिंप इ.
  2. मिठाचे २% द्रावण तयार करावे (१० लिटर पाण्यात अंदाजे २०० ग्राम मीठ).
  3. ३ लिटर चुन्याची निवळी तयार करावी (२ किलो कळीच्या चुन्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून)
  4. वरील दोन्ही द्रावणे समप्रमाणात घेऊन, १० किलो ऊसाच्या वाड्यावर किंवा कुट्टीवर १ ते १.५ लिटर प्रमाणे शिंपडून त्याला किमान १२ तास तसेच ठेवावे व नंतर जनावरांना खायला द्यावे.

अशाप्रकारे साधी सोपी पद्धत वापरून आपण आपल्या जनावरांचे आरोग्य सांभाळू शकता.

आपल्याला जर ही पद्धत फायदेशीर आहे असे वाटत असेल, तर खाली दिलेले बटन वापरून आपल्या मित्रांसोबत whatsapp/facebook वर नक्की share करा. तसेच आपले प्रश्न, शंका असतील तर अवश्य कमेंट करा.

Facebook Comments

*या ठिकाणी दिलेला मजकूर पशुपालकांच्या केवळ माहितीस्तव आहे, emergency च्या वेळी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!!!
error: Content is protected !!